खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ पार पडला.


रविवारी खानापूर येथील लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोझा, कार्याध्यक्ष बी. जे. बेळगावकर, डीडीपीआय लिलावती हिरेमठ, सहकार क्षेत्राचे जॉइंट रजिस्ट्रार बेंगळूरचे कल्लाप्पा ओबनगोळ, आरएफओ सुनिता निंबरगी, डॉ. शुभांगी जत्ती, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे विक्रम पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 

कार्यक्रमात गेल्यावर्षी एसएसएलसी परीक्षेत तालुक्यातील हायस्कूल मध्ये सर्वोत्तम गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांना ज्ञानवर्धिनी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पत्रकार निलीमा लोहार, डीडीपीआय लिलावती हिरेमठ, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील तसेच कल्लाप्पा ओबनगोळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एसएसएलसी परिक्षेबाबत मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.

खानापूर तालुक्यातील एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान मार्फत गेली सोळा वर्षे मोफत व्याख्यानमाला आयोजित करुन विषयानुरुप तज्ञ शिक्षकांकरवी मार्गदर्शन केले जात आहे. खेड्यापाड्यातील मुलांना एसएसएलसी संदर्भात मार्गदर्शन करुन तालुक्याचा निकाल शंभर  टक्के लावण्याचा यामागचा उद्देश आहे.

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजी जळगेकर यांनी प्रास्ताविक केले तर सचिव व्ही. बी. होसूर यांनी आभारप्रदर्शन केले. संचालक सजीव वाटूपकर आणि महेश सडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे इतर संचालक एम. डी. पाटील, एस. पी. धबाले, एन. एम. देसाई, एम. एफ. होनगेकर, प्रमोद आळवणी, पी. के. चापगावकर आदींनी अथक परिश्रम केले.

कार्यक्रमात खानापूर बीईओ अंबगी, डॉ. गणपत पाटील, आशा गिरी, सुरेन हिरे त्याप्रमाणे निवृत्त शिक्षक आणि मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.