बेळगाव / प्रतिनिधी  

बेळगाव येथून येळ्ळूर गावासाठी असणाऱ्या बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून तुडुंब भरलेल्या बसेस मधून प्रवाशांना बऱ्याचदा धोकादायकरित्या प्रवास करावा लागतो. याची तात्काळ दखल घेऊन परिवहन अधिकाऱ्यांनी येळ्ळूर येथील बस सेवा वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

येळ्ळूर (ता. बेळगाव) येथून बेळगाव शहरात ये - जा करणाऱ्या लोकांच्या तुलनेत या मार्गावर धावणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. येळ्ळूर गावासाठी ज्या बसेस मध्यवर्तीय बस स्थानकातून सुटतात त्या शहराच्या अर्ध्या वाटेतच प्रवाशांनी तुडुंब भरून जातात. विशेष करून गोवावेस सर्कल येथे येळ्ळूर बस पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. यामुळे शाळकरी मुले, महिला आणि वयस्कर नागरिकांची मोठी कुचुंबना होते. तुडुंब भरलेल्या बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच चढाओढ लागलेली असते. परिणामी शेवटी बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना बसच्या शेवटच्या पायरीवर कसेबसे थांबत धोकादायक रित्या प्रवास करावा लागतो. हा प्रकार एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा ठरू शकतो. तरी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन येळ्ळूर गावासाठी असलेल्या बसेसची संख्या वाढवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.