• अन्य एकजण गंभीर जखमी 

बेळगाव / प्रतिनिधी   

बेळगाव शहरातील बी.एस.येडियुराप्पा मार्गावर बुधवारी झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मंजुनाथ विठ्ठल होसकोटी (वय २६ रा. सुळेभावी, ता.बेळगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे तर निंगाप्पा रमेश होसमनी (वय २६ रा. सुळेभावी, ता.बेळगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सुळेभावी येथील विणकर कुटुंबातील मंजुनाथ आणि निंगाप्पा हे दोघे तरुण बुधवारी शहापूर बाजारात विणलेल्या साड्या देण्यासाठी गेले होते. यावेळी तेथून परतत असताना येडियुराप्पा मार्गावर मंजुनाथचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची नोंद दक्षिण विभाग रहदारी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.