बेळगाव : अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 असे दोन दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन मराठा मंदिर, गोवावेस येथे करण्यात आले आहे.
27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता फायर ब्रिगेड पासून ग्रंथ दिंडी निघणार असून त्या ग्रंथदिंडी चे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर यांच्या हस्ते होईल. ग्रंथदिंडी मराठा मंदिरामध्ये पोहचल्यानंतर कुसुमाग्रज नगरी चे उद्घाटन अशोक नाईक यांच्या हस्ते, पुस्तक प्रदर्शनाच्या रा. रं. बोराडे दालनाचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाच्या स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते तर बाबा पद्मनजी व्यासपीठाचे उद्घाटन मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होईल.
मुख्य उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाद जोशी नागपूर हे असून समारंभाचे अध्यक्षस्थानी तरुण भारतचे समूह प्रमुख व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.किरण ठाकूर हे राहतील.
दुसऱ्या सत्रात भाला, बरची, लाठी प्रात्यक्षिके चक्रपाणि शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्र यांच्यावतीने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या व्ही एस पाटील हायस्कूल,मच्छे चे विद्यार्थी सादर करतील .
तिसऱ्या सत्रात विद्यार्थी संमेलन होणार असून या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या स्वाती राजे, पुणे या तर अध्यक्षस्थानी सौ सुनीता देशपांडे, अध्यक्ष वसंत व्याख्यानमाला आणि स्वरूपा इनामदार, अध्यक्ष सरस्वती वाचनालय बेळगाव या राहतील.
चौथे सत्र सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होणार असून त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाद जोशी यांचे भाषण होईल या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनोद गायकवाड हे राहतील.तर संध्याकाळी सहा ते आठ या वेळात होणाऱ्या पाचव्या सत्रात नाट्यंकुर थिएटर्स यांनी निर्माण केलेला अभिजात मराठी दृकश्राव्य कार्यक्रम होईल.
दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी साडेदहा ते बारा पर्यंत मंगळागौरीचे खेळ, फ्रेंड सर्कल बेळगाव सादर करतील. त्यानंतर "आम्ही कचऱ्याच्या ग धनी" हे पथनाट्य प्रज्ञाप्रसाद व सहकारी सादर करतील. समूह गायनाचे प्रशिक्षण श्री विनायक मोरे हे देतील तर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होतील त्यामध्ये कथाकथन, नाट्यछटा लाठी प्रात्यक्षिके आणि शिवकालीन भाषेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले प्रयत्न यावरचा व्हिडिओ सादर केला जाईल.
तिसऱ्या सत्रात होणाऱ्या पालक -शिक्षक मेळाव्यास स्वाती राजे या मार्गदर्शन करणार असून जगदीश कुंटे हे अध्यक्षस्थानी राहतील. तर चौथ्या सत्रात दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळात कवी संमेलन होणार असून निमंत्रित कवींच्या कविता सादर केल्या जातील. तर पाचवे सत्र हा कृतज्ञता सोहळा असून त्यामध्ये या आनंद ?मेळाव्यासाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांचा आणि संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. शेवटचे सत्र अभिजात नाट्यसंगीत या विषयावर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे.
यासर्व कार्यक्रमाना समस्त मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संध्या देशपांडे, उपाध्यक्ष आप्पासाहेब गुरव, कार्याध्यक्ष विनोद गायकवाड, कार्यवाह अनंत लाड व इतर पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.
0 Comments