बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्हा रुग्णालयात बाळंतिणींच्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी निलजी (ता. बेळगाव) येथील बाळंतिणीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच,आता आणखी एका बाळंतिणीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गंगाव्वा लक्काप्पा गोंडकुंद्री (वय ३१ रा. करडीगुद्दी, ता. बेळगाव) असे मृत बाळंतिणीचे नाव आहे. गंगाव्वा हिची ही पहिलीच प्रसूती होती.

प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेल्या गंगाव्वा हिने शुक्रवार (दि. ३१) जानेवारी रोजी सीझेरियन प्रसूतीनंतर मुलाला जन्म दिला होता. त्यावेळी तिची आणि बाळाची  प्रकृती व्यवस्थित होती. 

मात्र आज दुपारनंतर रक्तदाब कमी झाल्याने तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.