- चोवीस तास पाणी पुरवठ्याबाबत केली चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावला चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, मालमत्ता कर भरताना निर्माण होणारी समस्या आणि हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा याबाबत आजी-माजी नगरसेवकांनी आज बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
माजी आमदार रमेश कुडची आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त शुभा बी. यांची भेट घेतली आणि बेळगाव शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
२००६ मध्ये बेळगाव शहराला हिडकल जलाशयातून २४ तास पिण्याचे पाणी पुरवले जात होते. पण एल अँड टी. कंपनीला पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्यापासून, शहरात २४ तासही पाणीपुरवठा झालेला नाही.
दर ७-८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. जुन्या महानगर पालिकेने २४ तास पाणीपुरवठा योजना देखील राबवली होती, ज्यामध्ये २०३१ पर्यंत १२ लाख लोकसंख्या अपेक्षित होती. माजी महापौर रमेश कुडची म्हणाले की, शहरातील लोकांना उद्योग आणि खाजगी क्षेत्राला दररोज पुरवठा होणारे पाणी मिळत नाही हे अन्यायकारक आहे.
माजी महापौर शिवाजीराव सुंठकर यांनीही पाणीप्रश्न आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. बेळगावमध्ये आधीच पाण्याची समस्या असताना हिडकल धरणातून हुबळी-धारवाडला पाणीपुरवठा करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
बेळगाव महानगरपालिकेत मालमत्ता कर भरताना लादलेल्या अटी आणि गोंधळ नवीन तंत्रज्ञानाद्वारे दूर करावा, असे माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले.
आयुक्त शुभा बी. यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. बेळगावमधील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन शहराच्या विकासासाठी अमूल्य आहे आणि ते व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, वंदना बेळगुंदकर, दीपक वाघेला, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, एन. बी. निर्वाणी, जयश्री माळगी, रणजीत चव्हाण पाटील, मधुश्री देशपांडे, विनायक गुंजटकर, मोहम्मद रोशन पीरजादे आणि इतर सहभागी होते.
0 Comments