•  98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

नवी दिल्ली : आपल्या देशात विविध भाषा आहेत. विविधतेतून एकता हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. मराठीने सर्व साहित्यांचा स्वीकार करत इतरांनाही समृद्ध बनविले. देशाला अध्यात्मिक ऊर्जेची गरज असताना, संतांच्या भक्ती आंदोलनातून समाजाला नवी दिशा मिळाली असे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना केले. 

आज सायंकाळी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पारतंत्र्याच्या काळात मराठी भाषेने जनमनात आक्रोशता निर्माण केली. इंग्रजांची झोप उडविली. मराठी नाटकांमधूनही देश प्रेमाची लहर उमटली. मराठी भाषा आणि साहित्याने शोषित वंचितांना नवी दिशा दाखवली.समाज सुधारकांनी साहित्याच्या माध्यमातून नवे स्तोत्र निर्माण केले. मराठीतून प्रभावी दलित साहित्यही निर्माण झाले.

मराठी भाषा ही अमृताहुनही गोड आहे. जगभरात बाराशे कोटीहून अधिक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषिकांना लागलेली अभिजात दर्जाचे आतुरता आता संपली आहे. माझ्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे माझे भाग्य आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष, अहिल्याबाई होळकर यांची 320 जयंती आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर आज जागतिक भाषा दिन आहे.अशावेळी हे संमेलन देशाच्या राजधानीत होत आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हे संमेलन केवळ एका भाषा आणि राज्यापुरते मर्यादित नसून या संमेलनाला मोठा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. अनेक महान विभूतींनी संमेलनाची अध्यक्षपद भूषविले आहे. या गौरवशाली परंपरेच्या सानिध्यात येण्याचे भाग्य मला लाभले.संघाच्या माध्यमातून मला मराठी भाषेचा परिचय झाला. आजही मी मराठीतील शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो.प्रत्येकाने मराठी भाषा जास्तीत जास्त शिकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. संमेलनाच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत.

विज्ञान कथा, आयुर्वेद, तर्कशास्त्रात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. भाषाही संस्कृतीची संवाहक असते. भाषेत समानता,समृद्धता, वीरता, आधुनिकता, शक्ती आणि युक्ती असते. मात्र भाषेच्या नावावर होणारा भेदभावाचा भ्रम दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. साहित्य समाजाचा आरसा आणि पथदर्शक आहे.

देश आणि समाजाच्या जडणघडणीत संमेलनाची महत्त्वाची भूमिका आहे. 2027 या परंपरेला 150 वर्ष तर 100 वे संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण बनवूया. त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागूया असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे, खजिनदार प्रकाश पागे, उज्वला महेंदळे आदी उपस्थित होते. यावेळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला तर संमेलनाचे मुख्य आयोजक सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानेश्वर प्रतिमा बहाल करण्यात आली. कार्यक्रमात उषा तांबे यांनी प्रास्ताविक सादर केले. संजय नाहार यांनीही यावेळी समयोचित विचार मांडले.