• फायनान्सरच्या छळाला कंटाळून संपविले जीवन 

बेळगाव / प्रतिनिधी 

फायनान्सर्सच्या छळाला कंटाळून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बेळगाव तालुक्यातील यमनापूर गावच्या हद्दीत ही घटना घडली. सरोजा किराबी (वय ५२ रा. शिरुर, ता. हुक्केरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सरोजा यांनी फायनान्समध्ये सबसिडी म्हणून सांगून २ लाख ३० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज मिळवून देणारा आरोपी होळेप्पा दड्डी याने अर्धे कर्ज स्वतः ठेवून उर्वरित कर्जाचे पैसे सरोजाला दिले. सरोजाने काही रक्कम परतफेड केल्यानंतर फायनान्स कंपनीने संपूर्ण कर्ज फेडण्याची मागणी केली. मात्र तिने फायनान्स कंपनीकडून सबसिडीवर कर्ज घेतल्याचा दावा केला. फायनान्स कंपनीने वारंवार त्रास दिला. होळेप्पा दड्डी याने कोणतीही मदत नाकारली. सततच्या त्रासाला कंटाळून सरोजाने आत्महत्या केली. याप्रकरणी मध्यस्थी होऊन कर्ज मिळवून देणाऱ्या होळेप्पा दड्डी वर बेळगावच्या काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात आला. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दलाला कडून फसवणुकीच्या घटनांबाबत काकती आणि माळमारुती पोलीस स्थानकात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी एक आठवड्यापूर्वीच होळेप्पा दड्डीला अटक केली असून सध्या तो हिंडलगा कारागृहात आहे. बेळगाव व हुक्केरी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांची फसवणूक केल्याबद्दल आरोपी होळेप्पा दड्डीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.