- खासदार प्रियंका गांधी यांची विशेष उपस्थिती
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण आज मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी मोठ्या थाटात पार पडले. याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेस संविधान समर्थक असून भाजप संविधानविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा सदस्या प्रियांका गांधी, विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, उपाध्यक्ष रुद्रप्पा लमाणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल, राज्य प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, कायदा मंत्री एच. के. पाटील, गृहमंत्री जी. परमेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तर प्रास्ताविकात विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर म्हणाले, गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण ही ऐतिहासिक घटना आहे. अखंड भारताच्या उभारणीसाठी शहीद झालेल्यांचे स्मरण करण्याचा हा विशेष दिवस आहे. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा सदस्या प्रियांका गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, विधान परिषदेचे सभापती बसवराज होराट्टी, मंत्री एच. के. पाटील व अन्य नेत्यांनी चरख्यातून धागा विणून महात्मा गांधीजींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.
गदग येथील ग्रामीण विकास आणि पंचायत राज विद्यापीठाचे नामकरण महात्मा गांधीजी विद्यापीठ असे करण्यात आले, आणि लोगोचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राज्यसभा सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे महात्मा गांधींचा पुतळा उभारून राज्य सरकारने संपूर्ण राज्याचा सन्मान करण्याचे काम केले आहे.
गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर माजी पंतप्रधान नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात देशाला संविधान दिले. याच्या रक्षणाचे काम तुमचे आहे. संविधान आणि लोकशाही नसती तर देशात अराजकता माजली असती. गांधीजींनी देश बांधणीची घोषणा पहिल्यांदा बेळगावात दिली असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरणनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. महात्मा गांधी यांनी १९२४ च्या बेळगाव राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी कर्नाटकच्या भूमीत त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले आणि स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा पुरस्कार केला.
भाजपने महात्मा गांधीजींना हिंदुविरोधी म्हटले आहे. मात्र, जीवनात गांधीजींची गोळी घालून हत्या झाली. तेव्हा प्राण त्यागतानाही त्यांनी हे राम म्हटले. आयुष्यभर त्यांना देश वाचवायचा होता. काँग्रेस संविधानाच्या बाजूने होते. तर भाजप संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाचे रक्षण झाले तर ते आपले रक्षण करेल. संविधानाला कधीही कमकुवत होऊ देऊ नये, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार, आमदार, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, माजी आमदार आदी उपस्थित होते.
0 Comments