- इमारतीवरून पडल्याने दोन सख्ख्या भावांपैकी १ ठार, दुसरा गंभीर जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
गांजा ओढण्यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत एक जण जागीच ठार तर दुसरा दोन्ही पाय तुटून गंभीर जखमी झाला. बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये काल शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांपैकी लहान असलेल्या सुशांत सुभाष पाटील (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मोठा भाऊ ओंकार सुभाष पाटील (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त महितीनुसार, सुशांत व ओंकार या दोघांना गांजाचे व्यसन जडले होते. व्यसनाधीन झालेले हे दोघे घरातील कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे पालकांकडून सतत ओरडा खात. काल शुक्रवारी रात्री देखील घरातील कामे करत नसल्याबद्दल पालकांनी दोघांनाही चांगलाच दम दिला.
त्यानंतर घरातली कामे कोण करणार? यावरून वाद घालत सुशांत व ओंकार हे दोघेही इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या जिन्यावर गांजा ओढण्यासाठी गेले. त्या ठिकाणी गांजा ओढण्यावरून दोघांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी गांजाच्या नशेमध्ये सुशांत व ओंकार इतके बेभान झाले की तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. या दुर्घटनेत सुशांत पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाला, तर ओंकार पाटील याचे दोन्ही पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओंकार पाटील याला अधिक उपचारासाठी बेळगावच्या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, निलजी गावातील तरुणांना गांजासारखे अंमली पदार्थ कुठून उपलब्ध होतात? याचा छडा लावला जावा. तसेच पोलीस खात्याने बेळगाव शहर परिसरातील अंमली पदार्थ विक्रीला तात्काळ आळा घालावा, अशी जोरदार मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे.
0 Comments