- वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची नवी मोहीम
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जंगल परिसरात दहशत माजविलेल्या वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी वनविभागाने नवा उपाय अवलंबला आहे. शिमोगा येथील तज्ज्ञ हत्तींचे पथक रानटी हत्ती तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी खानापुरात दाखल झाले आहे.
खानापूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले ग्रामस्थ व शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच हत्तींचा बंदोबस्त वनविभागासाठी डोकेदुखी ठरला आहे. आता वनविभागाने तज्ज्ञ हत्तींचे पथक शिमोगाहून खानापुरात आणून करून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी नवी मोहीम आखली आहे.
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावी वन्यप्राण्यांनी शेतातील ऊस, भात आणि अन्य पीके उद्ध्वस्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः करंबळ गावच्या शेत शिवारात हे प्रकार वाढत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून थेट वन विभागाला आव्हान देत एका रानटी टस्कराचा येथे मुक्त संचार सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रानटी हत्ती आणि अन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील प्रशिक्षित हत्तींचे पथक खानापुरात आणले आहे. खानापुराचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय वनाधिकारी माधुरी दलवाई व इतर अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग असून वन्य प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. यासर्व भागात वन ,पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती करण्यासह चोख बंदोबस्त ठेवला आहे.
0 Comments