- अनगोळ वासियांसाठी हा सोहळा ऐतिहासिक!
- शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या पूजन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उद्गार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या अनगोळ धर्मवीर संभाजी चौक येथील शिवशंभू तीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार (दि. ५) जानेवारी रोजी पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा जावळीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते छ. संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
प्रारंभी सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व सातारा जावळीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे अनगोळ नाका येथे आगमन झाले.
त्याठिकाणी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले आणि शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शोभायात्रेत ढोल पथक, ध्वजपथक, अश्व यांचा सहभाग होता. तसेच सुहासिनी कलश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती तर युवकांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि फेटे बांधण्यात आले होते. शोभायात्रा अनगोळ धर्मवीर संभाजी चौक इथपर्यंत काढण्यात आली. यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक केला. तसेच महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंदचा चव्हाण व माजी महापौर शोभा सोमनाचे यांच्याहस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीवर पाच नद्यांच्या जलाचा अभिषेक करून पाद्य पूजा केली. यानंतर संभाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालून पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित महापौर व उपमहापौर व मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पुष्पगुच्छ व मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अनगोळ वासियांसाठी आजचा सोहळा हा ऐतिहासिक आहे. अनगोळ ग्रामस्थांच्या मनातील भावना आणि इच्छा अनेक दशकांनंतर आज पूर्ण होत आहेत. या छत्रपती संभाजी चौकात संभाजी महाराजांची मूर्ती बसवण्याचे स्वप्न होते ते आज पूर्ण होत आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत की आज हा सोहळा आम्हाला पाहायला मिळत आहे, असे उद्गार त्यांनी काढले. शिवाजी महाराज हे एक दैवी अवतार होते. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचे नव्हते त्यांनी अठरापगड जातीला एकत्र करून आपले स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवराय कुण्या एका जातीच्या विरोधात लढले नाहीत. जिथे अन्याय झाला तिथे तिथे शिवाजी महाराज लढले आणि त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केले. म्हणून सर्वांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यायला हवा, असे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.
यावेळी महापौर सविता कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष केला तसेच आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत तणावाच्या वातावरणात शिवशंभू स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
- स्मारकाच्या लोकार्पणावरून दोन गटात धुसफूस :
अनगोळ येथील धर्मवीर शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात धुसफूस सुरू होती. एका गटाने रविवारी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, चौथऱ्याचे काही काम शिल्लक असतानाच घाई गडबडीत लोकार्पण सोहळा उरकण्यात येऊ नये, अशी मागणी दुसऱ्या गटाकडून केली जात होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा प्रशासन योग्य तो निर्णय घेईल सर्वांनी आपापल्या घरी राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले होते. पण एका गटाकडून रविवारी सकाळपासून स्मारकाच्या आवारात चौथरा सजावट करण्यासह लोकार्पण करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौकात दाखल झाले. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माघारी धाडले. त्यामुळे किरकोळ वादावादी वगळता मूर्ती अनावरण शांततेत झाले.
महापालिकेच्यावतीने शिव शंभू स्मारक उभारण्यात आले असल्यामुळे महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण या दोघांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली, त्यामुळे हा लोकार्पण सोहळा पूर्ण झाला. दुसरीकडे शासकीय पातळीवर स्मारकाचे लोकार्पण करण्यात यावे असे ठरविण्यात आलेले होते. पण त्याचा विचार न करता आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखालीच शिवशंभू स्मारकाचे उद्घाटन झाले.
0 Comments