बेळगाव / प्रतिनिधी 

प्लास्टिक मुक्त पर्यावरण निर्मितीचा उद्देश समोर ठेवून निसर्ग संवर्धना संदर्भात म्हैसूर ते अयोध्या निसर्ग जनजागृती सायकल फेरीस निघालेल्या म्हैसूरच्या बी. मंजुनाथ यांचे आज मंगळवारी सकाळी बेळगाव शहरात आगमन झाले.

म्हैसूर येथून कित्तूर मार्गे बेळगाव दाखल झालेल्या बी. मंजुनाथ याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, गेल्या रविवारी १९ जानेवारी रोजी मी म्हैसूर येथील श्री अंजनेया स्वामी मंदिरापासून या निसर्ग जनजागृती सायकल फेरीला प्रारंभ केला आहे. कोडगुचे खासदार आणि स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत माझ्या या उपक्रमाचा शुभारंभ झाला. कित्तूर, बेळगाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, प्रयागराज मार्गे मी २० दिवसांचा प्रवास करून अयोध्येला जात आहे अशी माहिती देऊन प्लास्टिक मुक्त पर्यावरण निर्मितीला प्रोत्साहन देणे, हा माझ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे बी. मंजुनाथ याने सांगितले.