बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग वाङमय चर्चा मंडळातर्फे रविवार दि. १९ रोजी सायंकाळी ६ वा. लोकमान्य रंगमंदिर येथे होत आहे.
गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ मूळ फ्रेंच नाटकाचे अतिशय प्रभावीपणे मराठीत रूपांतर करून भारतीय शैलीमध्ये चपखलपणे बसविण्यात आले आहे.
बेळगाव येथे १९८८ साली संगीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग सादर केला. या नाटकात सर्व स्थानिक कलाकारांचा सहभाग होता. या नाटकाचे दिग्दर्शन कै. डॉ. अशोक साठे यांनी केले होते. वाङमय चर्चा मंडळ, बेळगाव प्रायोजित या नाटकात प्रभाकर शहापूरकर, संगीता बांदेकर, मुकुंद दामले, विष्णुपंत कुलकर्णी, दया शहापूरकर इत्यादींनी आपले कलागुण दाखविले. पेडणेकर बंधूंनी या नाटकास साजेसे असे नेपथ्य केले. १९९२ साली दिल्ली येथे आयोजित अत्यंत प्रतिष्ठित अशा बृहनमहाराष्ट्र संगीत नाटक स्पर्धेत या नाटकाने दिल्लीत आपला झेंडा फडकवला.
नुकताच संगीत संशयकल्लोळ नाटकाचा ५० वा प्रयोग सादर करण्यात आला ही खरोखरच कौतुकाची व अभिमानाची बाब आहे. दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु अनेक रसिकांना या नाट्यकृतीचा आस्वाद घेता आला नाही.
त्यामुळे खास लोकाग्रहास्तव दि. १९ जानेवारी रोजी संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा प्रयोग, लोकमान्य रंगमंदिर, बेळगाव येथे करण्याचे योजिले आहे. नाट्य रसिकांनी या प्रयोगालाही असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments