• बेळगावात १५ वा राष्ट्रीय मतदार दिन २०२५ साजरा 

बेळगाव / प्रतिनिधी 

मतदान हा केवळ अधिकार नाही. हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येकाला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. काम करणाऱ्या हातांना सक्षम करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे. नागरिकांचे एक मत देशाची दिशा बदलू शकते, असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले. 

बेळगाव येथे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी १५ व्या राष्ट्रीय मतदार दिन - २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी  कित्तूर चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय ते कुमार गंधर्व कला मंदिर जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर कुमार गंधर्व कला मंदिरात आयोजित समारंभाचे उद्घाटन बेळगावचे प्रधान जिल्हा व न्यायाधिश टी.एन.इनवल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा सफाई समितीचे अध्यक्ष तथा जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा. बी., उपायुक्त उदयकुमार तलवार, रेश्मा तालिकोटी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना मतदानाचा पवित्र हक्क बजविण्याबाबत शपथ दिली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, मतदानाचे महत्त्व जाणून घ्या, ही तुमची शक्ती आहे. नागरिक हे लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.  प्रत्येक मताने देशाचे राजकारण बदलू शकते. नागरिकांचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. तरूणाई ही देशाची ताकद असल्याचे असे ते म्हणाले. नंतर विविध शाळांमधील मुलांना किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.