- गरोदर महिला - बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत केली चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
माजी नगरसेवक - महापौर असोसिएशनच्या सदस्यांनी आज बीम्सच्या संचालकांशी गरोदर महिला व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत तसेच रुग्णांना बेळगाव जिल्हा रूग्णालयात योग्य उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या सुविधांबाबत चर्चा केली.
बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल झालेल्या माजी नगरसेवक - महापौर असोसिएशनच्या सदस्यांनी अध्यक्ष रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली बीम्सचे संचालक अशोक शेट्टी यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.
बीम्समध्ये माता आणि नवजात मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे . तसेच रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञांची डॉक्टरांची सेवा मिळत नसल्याचे सांगण्यात येते. स्वच्छतेबाबत उपस्थित होत असलेल्या अनेक प्रश्नांवर माजीनगर सेवकांनी चर्चा केली.
यावेळी बोलताना बीम्सचे संचालक अशोक शेट्टी म्हणाले, बीम्समध्ये पूर्वींपेक्षा मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. जेव्हा इतर ठिकाणच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार केले जातात आणि अंतिम टप्प्यात बीम्समध्ये दाखल केले जाते. तेव्हा उपचार कुचकामी ठरतात. तसेच काहीवेळा तज्ञांची कमतरता आणि सुविधांचा अभाव आहे. ही बाब यापूर्वीच शासनाच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आजी - माजी नगरसेवक व नगरसेविकांनी , गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविकांना सक्षम करून गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करावी. बीम्सच्या वरिष्ठांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या कामात येणाऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करून त्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असे त्यांनी म्हणाले. आपण बीम्सला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असून लवकरच जिल्हापालक मंत्र्यांची भेट घेऊन बीम्सच्या सुविधा व व्यवस्था सुधारण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवाजी सुंठकर, दिपाका वाघेला, विजय मोरे, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, जयश्री माळगी, सतीश गौरगोंडा, रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह माजीनगर सेवक व महापौरांचा सहभाग होता.
0 Comments