बेळगाव / प्रतिनिधी
बसवण कुडची येथे आयोजित कुडची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत टायगर क्रिकेटर्सने अंतिम सामन्यात रोमांचक विजय मिळवत ट्रॉफी आपल्या नावे केली. या स्पर्धेत जिटीएम स्पोर्ट्स उपविजेता ठरला, तर उत्कृष्ट खेळाडूंना खास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बसवण कुडची येथे समाजसेवक परशराम बेडका आणि हिरेमठ ग्रुप यांच्या पुढाकाराने आयोजित कुडची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. स्पर्धेसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अंतिम सामन्यात जिटीएम (गजानन तरुण मंडळ) स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत पाच षटकांत ५३ धावा केल्या आणि टायगर क्रिकेटर्ससमोर विजयासाठी ५४ धावांचे लक्ष्य ठेवले. टायगर क्रिकेटर्सच्या किरण शंकरगौडा याने निर्णायक क्षणी उत्कृष्ट फलंदाजी करत ५ चेंडूंत ५ चौकार मारून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामना अतिशय चुरशीचा झाला, आणि अंतिम षटकात एक चेंडूवर एका धावेची गरज असताना संजूने निर्णायक धाव घेत संघाला विजयी केले. किरण शंकरगौडा याने संपूर्ण स्पर्धेत १०१ धावा करत "मॅन ऑफ द मॅच" चा किताब पटकावला, तर लकी मुचंडीकर याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले. एस व्ही.जे. संघाने तिसऱ्या क्रमांकावर समाधान व्यक्त केले.
पारितोषिक वितरण माजी आमदार अनिल बेनके, समाजसेवक परशराम बेडका, राजशेखर हिरेमठ आणि शंकर रवळूचे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे समालोचन आणि स्वागत महेश ईटगेकर व राजू चौगुले यांनी केले. याप्रसंगी गावातील मान्यवर व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये परशराम बेडका, बसवंत कौलगी, यल्लाप्पा मुचंडीकर, संभाजी गिरी, डॉ. अमित हम्मनावर, अभय कित्तूर, बाळू बेडका, यल्लाप्पा हलगेकर, कृष्णा दिवटे, संजू बडिगेर यांचा समावेश होता. खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी सामन्याचा मनमुराद आनंद घेतला.
0 Comments