खानापूर / प्रतिनिधी 

दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटून, दुचाकीरस्त्यानजीक असलेल्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात  रायबाग तालुक्यातील एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. खानापूर परीश्वाड मार्गावर, दोडहोसुर व यडोगा क्रॉसनजीक सोमवार (दि. ६) जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली. सावंत निंगाप्पा शॅंडगे (वय २२, रा. मानबरगट्टी नंदीकुरली ; ता. रायबाग) असे मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सावंत शिंदे व अभिषेक निंगाप्पा आगसिमनी हे दोघेजण, केए २३ ईवाय ७००९ क्रमांकाच्या दुचाकी वरून  परिशवाड - खानापूर मार्गावरून, खानापूरकडे निघाले होते. मोटरसायकल भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवत येत असताना, दुपारी २.०० वा., दोडहोसुर गावातील यडोगा क्रॉसजवळ, दुचाकीवरील ताबा सुटल्याने, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यामुळे सावंत शिंदे हा जागीच ठार झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून, पुढील तपास सुरू आहे.