• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती 

बेळगाव / प्रतिनिधी 

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चार जणांचे मृतदेह गुरुवारी दुपारपर्यंत बेळगावात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रथम चारही मृतदेह प्रयागराजहून दोन रुग्णवाहिकांमधून दिल्लीला नेले जातील आणि एअर लिफ्टने दिल्लीहून बेळगावात आणले जातील , अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. 

प्रयागराज कुंभमेळ्याला गेलेल्या बेळगावातील चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने विशेष पथकाची नेमणूक केली असून कुंभमेळ्यातील आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी विशेष जिल्हाधिकारी हर्षा शेट्टी आणि बेळगाव जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रुती प्रयागराजला गेले आहेत. चारही मृतदेह बेळगाव जिल्ह्यात परत आणण्यासाठी आपले पहिले प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात बेळगाव येथील महादेवी भावनूर (वय ४८,रा. शिवाजीनगर), अरुण कोपर्डे (वय ६१, रा. शेट्टी गल्ली), ज्योती हत्तरवाट (वय ४४, रा.वडगाव), मेघा हत्तरवाड (वय ४४, रा.वडगाव) यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, बेळगाव तहसीलदारांना मृतांच्या घरी पाठवून प्रयागराजला गेलेल्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर बेळगावातील चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.

कुंभमेळा दुर्घटनेतील जखमींच्या वैद्यकीय उपचारासाठी दोन विशेष अधिकारी येणार आहेत. जखमींचा आकडा जिल्हा प्रशासनाला मिळत असल्याचे ते म्हणाले.