मकर संक्रांती विशेष : मकर संक्रांती हा आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरा करण्यात येणारा एक महत्त्वाचा सण इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीमधून मकरराशी मध्ये प्रवेश करत असतो. आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांपैकी मकर संक्रांतीच्या सणाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीबद्दलची सविस्तर माहिती.

यावर्षी आज मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. 


मकर संक्रांती माहिती : मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला सण असल्यामुळे या सणाला खूप महत्त्व आहे. या सणापासून अनेक सणांची सुरुवात होत असते. एकमेकांमध्ये स्नेह निर्माण करणारा मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी तिळगुळ एकमेकांना वाटण्यात येत असते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून सर्वांना स्नेहाने शुभेच्छा देण्यात येत असतात. सर्व मित्रमंडळी तसेच लहान मुले मोठी माणसे गावातील महिला मंडळी एकमेकांच्या घरी तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. आणि तिळगुळ वाटप करून एक छोटीशी भेट म्हणून वस्तू सुद्धा वितरण करत असतात. त्याला वाण देणे असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या वाणांमध्ये ऊस, बोर, हरभरा तसेच तिळगुळ व गहू यांचा समावेश असतो.

मकर संक्रांती या सणाचे महत्त्व : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मराठी पौष महिन्यामध्ये हा सण येतो. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. मकर संक्रांतीच्या सणाला उत्तर नारायणी उत्सव असे सुद्धा म्हटले जाते. कारण की या दिवशी सूर्य देवाने उत्तर नारायणी चळवळ सुरू केलेली होती. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे या दिशेने जात असतो. मकर संक्रांती या सणाला वेगवेगळे महत्त्व असून देशातील प्रत्येक भागामध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नावांनी साजरा करण्यात येतो.

मकर संक्रांती सणाबद्दल पौराणिक कथा : हिंदू धर्माच्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा असते. मकर संक्रांत या सणाला सुद्धा पौराणिक कथा आहे. मकर संक्रातीच्या पौराणिक कथेनुसार मकर संक्रांत या दिवसापासून स्वर्गाची दरवाजे उघडतात आणि स्वर्गाचा दिवस सुरू होतो. मकर संक्रांत या सणाच्या दिवशी भगवान विष्णू यांनी असूरांचा पराभव करून पृथ्वीवर त्यांचा विजय मिळवला होता असे मानण्यात येते. तेव्हापासूनच म्हणजेच भगवान विष्णू यांनी असूरांवर मिळवलेल्या या विजयाचे प्रतीक म्हणून मकर संक्रांतीच्या हा सण साजरा करण्यात येतो. 

मकर संक्रांती व तिळगुळाचे महत्त्व :  मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांना गोड असलेले तिळगुळ वाटून नात्यांमध्ये सुद्धा असाच गोडवा राहावा, आणि प्रत्येकांसोबत स्नेहपूर्ण संबंध असावे हा या मकर संक्रांतीच्या निमित्त तिळगुळ वाटण्याचा उद्देश असतो. 

मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू वाटण्याची  परंपरा आहे. भूतकाळातील कटू गोष्टी विसरून नवीन गोड सुरुवात करण्याची परंपरा आहे. वैज्ञानिक आधारावर बोलायचे झाले तर तिळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि यातील तेलामुळे शरीराला भरपूर स्निग्धताही मिळते. एकदम कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या शरीराला स्निग्ध आणि उष्ण पदार्थांची आवश्यकता असते  आणि त्यामुळे तिळगुळ हे शरीरासाठी महत्वाचे ठरते.

मकरसंक्रात या सणाच्या दिवशी तिळाने सूर्य, विष्णू, शनिदेवाची पूजा केली जाते. खरतर शनि महाराजांनी आपल्या वडिलांना राग आल्यावर शांत ठेवण्यासाठी तिळाची पूजा केली होती. तिळाची पूजा केल्याने शनि महाराजांना सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी शनिमहाराजांना वरदान दिले की, जेव्हा कधी मी मकर राशीत प्रवेश करेन त्यादिवशी तिळाद्वारे माझी पूजा कर. यामुळे शनिचा दोष नष्ट होऊन सुख, समृद्धी आणि शांती लाभेल, असेही मानतात.

ज्योतिषशास्त्रानुसार गुळाचेही महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते. गूळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनि आणि गुरु ग्रहांचे कार्य शुभ होते. तीळगूळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होऊन सर्वत्र शांती पसरते आणि शनिमहाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो, असेही मानतात.