(फोटो सौजन्य : श्री. राजू कंग्राळकर, कोनेवाडी )

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

श्री क्षेत्र सौंदत्ती येथे दि. १३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या श्री रेणुका देवी यात्रेसाठी आज शुक्रवारी बेळगाव तालुक्याच्या कोनेवाडी गावचे भाविक सौंदत्तीला रवाना झाले.

या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच गावात भाविकांची लगबग सुरु होती. यामध्ये विशेषतः महिला वर्गाची धावपळ दिसून आली. गावातील गल्लोगल्ली तसेच प्रमुख मार्गांवर यल्लमा डोंगरावर जाण्यासाठी ठरविण्यात आलेली वाहने उभी असलेली पाहायला मिळाली. यात्रेसाठी जाण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर रेणुका मातेच्या जयघोषात अन् भंडाऱ्याच्या उधळणीत गावातील प्रत्येक गल्लीप्रमाणे भाविकांनी आपापल्या वाहनातून सौंदत्तीकडे प्रस्थान केले. सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्यात आला.