- भाजप महिला मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बाळंतिणी आणि नवजात शिशूंचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, सरकार काहीही उपाय योजना करत नाही, असा गंभीर आरोप भाजप महिला मोर्चाने केला आहे. यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाने आंदोलन केले.
या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला की, राज्यात बाळंतिणी आणि नवजात शिशुंच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, मात्र राज्य सरकार कोणतेही ठोस उपाय करत नाही. भाजप जिल्हाध्यक्ष गीता सुतार यांनी म्हटले, "काँग्रेस सरकारची प्रशासन व्यवस्था कोसळली आहे. अधिकारी आणि ठेकेदार आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे बाळंतिणींच्या मृत्यूची मालिका सुरू आहे. सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे." त्यांनी हेही सांगितले की, "जर सरकार काम करू शकत नसेल, तर त्यांनी राजीनामा देऊन घरी जावे .
त्याचवेळी भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, बिम्स रुग्णालयात आतापर्यंत २९८ नवजात शिशु आणि १४ बाळंतिणींचे मृत्यू झाले आहेत, आधुनिक रुग्णालये तयार केली तरी त्यांचे उद्घाटन होत नाही. राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी, बाळंतिणींच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारावी.”
जर बाळंतिणीच्या मृत्यूंसाठी न्याय मिळवून दिला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप नेत्या शिल्पा केकरे यांनी सांगितले, बाळंतिणी आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण गांधारीप्रमाणे काँग्रेस सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बाळंतिणीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच मुलांचे पालनपोषण सरकारने करावे. अशी मागणी शिल्पा केंकरे यांनी केली.
या आंदोलनात भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments