• शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त 

बेळगाव / प्रतिनिधी 

त्रस्त शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन, तसेच बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरलेल्या बळ्ळारी नाल्याच्या काँक्रिटीकरणाचा  निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच शेतकऱ्यांनी अभिनंदन केल आहे.

दरवर्षी पावसाळ्यात बळणारे नाल्याला पूर येऊन काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. बळ्ळारी नाला काठा लगतच्या सुमारे ५ हजार एकर सुपीक जमिनीवर पुराचा परिणाम होत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नाल्यातील जलपर्णी व गाळ काढला जावा. नाल्याचे कॉंक्रिटीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळे अलीकडच्या वर्षात यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बळ्ळारी नाला विकासाची जोरदार मागणी केली होती.

या मागणीचा वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, जुने बेळगाव वगैरे शिवारातील शेतकऱ्यांच्यावतीने शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली अन्य शेतकरी नेते नारायण सावंत, कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, मनोहर हलगेकर यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत गेल्या पावसाळ्यात पालकमंत्री जानकीहोळी यांनी भर पावसात बळ्ळारी नाल्याला दिलेल्या भेटी प्रसंगी सदर नाल्याचा लवकरच निश्चितपणे विकास केला जाईल, असे ठाम आश्वासन दिले होते.

त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास त्यांनी सुरुवात केली असून बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत नाल्याच्या काँक्रिटीकरणाचा आणि त्यासाठीचा सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बळ्ळारी नाल्याला भेट दिली. याप्रसंगी शेतकरी नेते कीर्तीकुमार कुलकर्णी, अमोल देसाई, मनोहर हलगेकर आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पालकमंत्री जारकीहोळी यांनी नाल्याची पाहणी करून त्यांच्यासोबत असलेल्या सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे वगैरे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. 

उपलब्ध माहितीनुसार बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.