बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या अनगोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणावरून झालेला गोंधळ आता बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. या संदर्भात शनिवार (दि. ४) जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी महापौर, उपमहापौर आणि बेळगाव दक्षिणचे आमदार यांच्यासह पंच भाजप कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यानंतर कोणालाही त्रास न होता हा कार्यक्रम सौहार्दपूर्णपणे पार पाडण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
उद्या रविवार दि. ५ जानेवारी रोजी बेळगावातील अनगोळ सर्कल येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, काही स्थानिक संघटनांनी सोहळा इतक्या घाईगडबडीत आयोजित करण्यास आक्षेप घेतला असून, अधिक व्यापक प्रमाणावर व शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करावा अशी मागणी केली आहे.
महापौर, उपमहापौर आणि आमदारांनी मात्र कार्यक्रम नियोजित वेळेतच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्थानिक पंच, नगरसेवक, नागरिक, आणि कंत्राटदार यांच्यासोबत शनिवार (दि. ४) जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व मूर्ती अनावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले असून, अनावरण सोहळा लांबणीवर टाकल्यास त्यांच्या मानमर्यादेला धक्का लागेल, असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी संबंधित संघटनांचे म्हणणे, स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका, आणि कागदपत्रांचा आढावा घेतला. मूर्ती अनावरणामुळे सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
0 Comments