• मारिहाळ गावातील घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

पतीची साथ सोडून पत्नीने सोने आणि रोख रक्कम घेऊन मुलांसह पतीच्या मित्रासोबत पळ काढल्याची घटना बेळगाव तालुक्याच्या मारिहाळ गावात उघडकीस आली आहे. 

पती आसिफ सय्यद हा व्यवसायाने ड्रायव्हर असल्याने गेले १० - १५  दिवस घरी नव्हता. आसिफ सय्यद हा मूळचा नंदगड (ता. खानापूर ; जि. बेळगाव) येथील रहिवासी असून तो आपल्या पत्नीसाठी आई - वडिलांना सोडून स्वतंत्र राहत होता.  ड्रायव्हर असल्यामुळे बहुतेकवेळा तो घराबाहेरच राहत असे. दरम्यान बुधवारी रात्री १२ वाजल्यानंतर आसिफची पत्नी मसाबी आसिफ सय्यद दोन मुलींसह ६० ग्रॅम सोने, ५ लाखांची रोकड, सिलिंडर आणि जमिनीची कागदपत्रे घेऊन पतीच्या मित्रांसोबत फरार झाली.

ड्युटी संपवून पती आसिफ घरी परतला असता त्याला पत्नी तिथे नसल्याचे आढळून आले. यानंतर लागलीच त्याने मारिहाळ पोलीस स्थानकात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, बरीच चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मसाबी सय्यद बसवराज सेठीमनी नावाच्या व्यक्ती सोबत फरार झाल्याचे समोर आले.

बसवराज सेठीमनी आणि आसिफ सय्यद हे ड्रायव्हर असल्यामुळे व्यावसायिकपणे एकमेकांना सुरुवातीपासून ओळखत होते. तसेच ते चांगले मित्रही होते यात काही शंका नाही. आसिफ आणि मसाबीने २०१७ मध्ये लग्न केले आणि त्यांना २ मुली आहेत. सय्यदने मसाबीच्या नावावर नंदगड आणि बाळेकुंद्री (बी.के) येथे जमीन खरेदी करून तिच्या नावावर कारही घेतली. पण बसवराज सेठीमनी या विवाहित आणि मुले असलेल्या मित्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल त्याला माहिती नव्हती. याबद्दल मसाबीच्या आईला माहिती होती पण तिने सय्यदला सांगितले नाही. तिनेही मसाबीला साथ दिली. पती सय्यदने सांगितले, बसवराज सेठीमनी याने माझ्या पत्नी व मुलांचे अपहरण केले. आसिफचा भाऊ मुदस्सर याने पळून गेलेल्या मसाबी आणि मुलांचा शोध सुरू केला असून, मरिहाळ पोलिस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्याने सांगितले.