• सरकार, गृह विभाग, पोलीस विभागाला नोटीस जारी

धारवाड : बेळगावच्या सुवर्णसौधच्या समोर पंचमसाली समुदायाला २ए आरक्षण देण्याच्या संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीस विभागाने केलेल्या लाठीमारावर प्रश्न उपस्थित करत, आता

कूडल संगमचे बसव जय मृत्युंजय स्वामीजी उच्च न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणी आता सरकार, गृह विभाग, आणि पोलीस विभागांना न्यायालयाने नोटीस जारी केली आहे, अशी माहिती जय मृत्युंजय स्वामीजी यांनी दिली.

याबाबत धारवाडमध्ये माध्यमांशी बोलताना स्वामीजी म्हणाले, धारवाड उच्च न्यायालयात लाठी चार्जविरुद्ध रिट याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आता धारवाड उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने सरकार, गृह विभाग आणि पोलीस विभागाला नोटीस जारी केली आहे.

पंचमसाली वकिल परिषदेसह चार व्यक्तींनी ही रिट याचिका दाखल केली आहे. लाठी चार्ज केल्यानंतर १२ आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ती रद्द करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री यांना माफी मागण्याची मागणी केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी याबाबत काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागले. आमच्या वतीने प्रभुलिंग नावलगी आणि पूजा सवदत्ती यांनी युक्तिवाद केला.

प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. आम्हाला न्यायालयात जावे लागले आहे. आपल्यावर हल्ला झाला आहे, त्याबद्दल समाजाच्या लोकांना धैर्य गमावू नये. हल्ल्यात जखमी झालेल्यांना मानसिक आधार देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. बेळगावमधील जखमींच्या घरी २३ डिसेंबर रोजी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.