• जोरदार घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांचा आक्रोश 
  • महिला आंदोलकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून व्यक्त केला संताप 

बेळगाव / प्रतिनिधी 

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह  वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपचे विधान परिषद सदस्य सी.टी.रवी यांच्या विरोधात शनिवारी बेळगावात  विविध संघटना आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली.

प्रारंभी क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानापासून राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध संघटना आणि हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी भव्य निषेध रॅली काढली. यावेळी आंदोलक महिलांनी सी.टी.रवी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा जाळला. 

यावेळी शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत सी.टी.रवी यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. 

सी. टी. रवी यांची विधान परिषदेच्या जागेवरून तात्काळ हकालपट्टी करावी. विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेत असे सदस्य नसावेत. सीटी रवी यांना बडतर्फ करेपर्यंत राज्यभर आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आदिवेष इटगी यांनी सांगितले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर राणी चन्नम्मा, बेलवाडी मल्लम्माच्या पवित्र भूमीत महिला आमदार तथा मंत्री म्हणून राज्य विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. तेव्हा सी. टी. रवी यांना तात्काळ विधान परिषद सदस्य पदावरून बडतर्फ करण्याची मागणी शंकरगौडा पाटील यांनी केली.

लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे. सीटी रवी यांनीही स्वतःच्या घरी मुली आहेत हे न विसरता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपमान केल्यामुळे विधान परिषद सदस्य पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांची प्रतिष्ठा राखावी अशी मागणी बसवराज मॅगोटी यांनी केली.   

'बेटी बचाओ... बेटी पढाओ' चा नारा देणाऱ्या भाजपच्या विधान परिषद सदस्याने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप आमदार सी.टी. रवी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसे न केल्यास राज्यभर महिलांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलक रोहिणी बाबासेठ यांनी दिला.

यावेळी अन्य आंदोलकांनी विधान परिषद सदस्य सीटी रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले, हा संपूर्ण कर्नाटकातील महिलांचा अपमान आहे. काँग्रेसच्या चांगल्या मंत्र्याचे काम न बघवल्याने भाजप सदस्याने असे वर्तन केले आहे. त्यांना आम्ही धडा शिकवू, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाहून महिला राजकारणात येत असल्याचे आज आणखी एका महिला आंदोलकाने सांगितले. अशावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सी. टी. रवी यांनी अपमान केला. मंत्री हेब्बाळकर राज्याच्या विकासासाठी झटत आहेत. हा केवळ लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपमान नाही. तर संपूर्ण कर्नाटकातील महिलांचा अपमान आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. 

त्यानंतर बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी सीटी रवी यांना तत्काळ परिषद सदस्य पदावरून निलंबित करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन सादर केले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.