• आमदार सीटी रवी यांचा काँग्रेसवर आरोप 

बेळगाव / प्रतिनिधी 

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार आमदार सीटी रवी यांच्या विरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सीटी.रवी यांनी विधानपरिषद सभागृहात मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांना अपमानास्पद शब्द वापरल्याने गुरुवारी विधानसभेत भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर पोलिसांनी सीटी रवी यांना सुवर्ण विधानसौधमधून ताब्यात घेतले. सीटी रवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर बंगळुरू येथील न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे सांगून त्यांना कारमधून रात्रभर हिरेबागेवाडी, खानापूर - कित्तूर - सौंदत्ती - रामदुर्ग यासह संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात फिरवले. 

त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान खानापूर पोलिस स्थानकातून नेत असताना व्हिडीओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत सीटी रवी यांनी काँग्रेसवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

सीटी रवी यांची भेट घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र आधीच बेळगावात दाखल झाले असून त्यांनी सीटी रवी यांच्या अटकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे.