बेळगाव / प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात याव्यात, विद्यार्थ्यांच्या शुल्कातील भेदभाव दूर करण्यात यावा आणि शक्ती योजनेंतर्गत अधिकाधिक बस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. 

यावेळी राणी चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत उच्च शिक्षणमंत्री आंदोलनास्थळी येऊन निवेदन स्वीकारून सभागृहात चर्चा करून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तांत्रिक प्रश्न शासनाने तातडीने सोडवावा. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्टायपेंड देतानाही शासन भेदभाव करत आहे. हा प्रश्नही सोडवला पाहिजे. विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. मात्र शक्ती योजनेमुळे बसेसवर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने अधिक बस सुविधा उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र संघर्ष केला जाईल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते भूषण घोडगेरी यांनी इशारा दिला.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शेकडो सदस्य सहभागी झाले होते.