बेळगाव / प्रतिनिधी
सालाबादाप्रमाणे यावर्षी ही बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने ५ जानेवारी रोजी बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने नामवंत मुलांच्या कुस्त्यांबरोबरच नवोदित कुस्तीगारांच्या प्रोत्साहनार्थ कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते.
५ जानेवारी रोजी होणाऱ्या कुस्ती मैदानाचे प्रसिद्ध पत्रकाचे आज रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाची सर्वांना माहिती कळावी अधिकाधिक मर्दानी कुस्ती मैदानात सहभागी व्हावे, यासाठी कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सदर प्रसिद्धी पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, कुस्ती मैदानाचे प्रमुख देणगीदार गोविंद टक्केकर, हिंदू को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक अनंत जांगळे,संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार,कार्याध्यक्ष हिरालाल चव्हाण, मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष विजय सावंत, सेक्रेटरी संतोष होनगल, तांत्रिक कमिटीचे अध्यक्ष पै.अतुल शिरोळे, अशोक हलगेकर, माजी प्राध्यापक सुरेंद्र देसाई, संजय चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी नवोदित मल्ल उपस्थित होते.
उपस्थित सदस्यांनी जानेवारीमध्ये होणाऱ्या कुस्ती दंगली बाबत चर्चा केली कुस्ती दंगल यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यावर दिलेल्या जबाबदारीनुसार कामे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सुरेंद्र देसाई यांनी कुस्ती दंगलीसाठी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली गोविंद टक्केकर यांनी गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीच्या कुस्ती दंगलीला ही भरीव आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.
यावर्षी पहिल्या क्रमांकाची कुस्ती पै. प्रकाश इंगळगी कर्नाटक चॅम्पियन विरुद्ध पै प्रेम जाधव यूनिवर्सिटी ब्लू लहान कंग्राळी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील विरुध्द रुद्राप्पा येमेटी, तिसरा क्रमांकाची कुस्ती सुनील मैत्री विरुद्ध निखिल पाटील यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक चटकदार प्रेक्षणीय कुस्त्या पाहण्याची संधी बेळगाव आणि परिसरातील कुस्ती शौकिनांना लाभणार आहे. मैदानाच्या तयारीसाठी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच जय्यत तयारी चालविली आहे.निकाली कुस्त्यांच्या मोफत जंगी मैदानाला कुस्तीप्रेमींनी आर्थिक मदत देऊन बेळगावची कुस्ती परंपरा प्रोत्साहित करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments