- दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन
नवी दिल्ली : दोनवेळा देशाचे पंतप्रधान पद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. यानंतर पंतप्रधान मोदींसह पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली.
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग (वय ९२) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी सकाळी ८.०६ वा. एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वसनाचा गंभीर त्रास होत असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. पण रात्री ९.१५ वा. च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहनसिंग १९९१-९६ दरम्यान पी. व्ही.नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी व्यापक सुधारणा घडवून आणल्या ज्याने अर्थव्यवस्थेचा कायापालट केला.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बेळगाव येथील ‘गांधी भारत’ काँग्रेस अधिवेशनात उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. यानंतर खासदार प्रियंका गांधी, प्रभारी वेणुगोपाल यांच्यासह अन्य नेत्यांनी गुरुवारी रात्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मनमोहन सिंग यांची अद्वितीय सेवा आणि राष्ट्रासाठी केलेले अतुलनीय योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल. आर्थिक सुधारणा, राजकीय स्थैर्य आणि उन्नत जीवनाचा वारसा त्यांनी मागे सोडला आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी कळताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांना राहुल गांधींना धक्का बसला. यावेळी श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मी गुरू गमावला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी राहुल कर्नाटकातील बेळगावमध्ये पोहोचले होते. यावेळी मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि इतर मान्यवरांनी मनमोहन सिंग यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा एक महान नेता डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मनमोहन सिंग हे विनम्र उत्पत्तीतून एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनले. अर्थमंत्री म्हणून त्यांनी विविध सरकारी पदांवर काम केले आणि आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत शिक्कामोर्तब केले. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही चमकदार होता. आपले पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत राज्यभर दुखवटा असेल. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दिल्ली राजघाटाजवळ पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली उतरवण्यात आला आहे. केंद्र सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत आणि ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मनमोहन सिंग यांची मुलगी परदेशातून येण्याची शक्यता आहे आणि ती आज दुपारी किंवा संध्याकाळी दिल्लीला पोहोचू शकते. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सांगितले.
0 Comments