- मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दि. २३ डिसेंबरला प्राप्त झाली. विनोद कांबळी अचानक बेशुद्ध झाल्याने त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठिक असली तरी चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पण आता त्यांचा मेडिकल अहवाल समोर आल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे.
या अहवालामध्ये विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सोमवारी ही माहिती दिली. विनोद कांबळी यांना २१ डिसेंबरला चक्कर आल्याने ठाण्यातील आकृती रूग्णालयात दाखल केले होते.
कांबळी यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, मुंबईस्थित माजी भारतीय फलंदाजाने सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना शनिवारी भिवंडी शहरातील काल्हेर परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यानंतर आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर देखरेख करणाऱ्या वैद्यकीय पथकाला अनेक तपासण्यांनंतर त्यांच्या मेंदूमध्ये गाठी आढळल्या, अशी माहिती त्रिवेदी यांनी दिली. कांबळी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आज मंगळवारी टीम अतिरिक्त वैद्यकीय तपासणी करेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्रिवेदी यांनी असेही सांगितले की रुग्णालयाचे प्रभारी एस. सिंग यांनी कांबळीला त्यांच्या वैद्यकीय सुविधेत आजीवन मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. विनोद कांबळी हे एका दशकाहून अधिक काळ आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत.
0 Comments