• वैविध्यपूर्ण शैलीतील पाककृती ठरल्या लक्षवेधी  

बेळगाव / प्रतिनिधी 

सत् संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार (दि. २१) डिसेंबर रोजी माता पालकांचे पाककौशल्य दाखवणारी फायरलेस कुकिंग (इंधन विरहित पाककला) स्पर्धा पार पडली. निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे, पर्यावरणाविषयी जागरूकता आणि माता पालकांना आग (इंधन) न वापरता स्वयंपाकाचे नाविन्यपूर्ण तंत्र शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे हा स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश होता.

या स्पर्धेत नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या २३ हून अधिक माता पालकांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. प्रत्येक माता स्पर्धकाला न शिजवलेले तसेच कच्चे पदार्थ वापरून १ तासाच्या आत डिश (पाककृती) तयार करायची  स्पर्धा होती. सृजनशीलता, सादरीकरण आणि चव या विषयाला अनुसरून डिशेसचे (पाककृतीचे) परिक्षण (मूल्यमापन) करण्यात आले. इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी तन्वी पाटीलची आई श्रीमती.अनिता पाटील आणि इयत्ता ९ वी चा विद्यार्थी श्रीरंग कुलकर्णी याची आई श्रीमती. माधवी कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

पालकांनी सॅलेड्स, स्मूदी, सँडविच, मिष्टान्न आणि स्नॅक्ससह विविध प्रकारचे पदार्थ तयार करून प्रचंड नावीन्य दाखवले.अनोखी नावे आणि प्लेटिंग शैलीतील साकारलेल्या पाककृतींनी स्पर्धेत रंगत आणली. 

सदर स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक युकेजी इयत्तेतील विद्यार्थिनी समृद्धी बोकडे हिची आई शकुंतला बोकडे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक इयत्ता पहिलीचा विद्यार्थी राजवीर काकतकर याची आई सरिता काकतकर, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक इयत्ता पहिलीची  विद्यार्थिनी धन्वी मराठे हिची आई भावना मराठे यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित करण्यात आले तर इतर सहभागी स्पर्धकांना उत्कृष्ट डिशसाठी (पाककृतीसाठी) प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.