बेळगाव / प्रतिनिधी  

आझादनगर येथील केईबी कार्यालयानजीक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली आहे. रोहित कल्लाप्पा कदम (वय २३, रा.हुदली) आणि उमेश मनोहर पावले (वय २४, रा. कुंभार गल्ली, कडोली) अशी त्यांची नावे आहेत.

रविवार दि. ८ रोजी  सायंकाळी सहाच्या दरम्यान आपले काम उरकून एक महिला घराकडे जात असताना आझादनगर केईबी कार्यालयानजीक दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तपास करून वरील दोघा भामट्यांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीची एक मोटरसायकल, एक चाकू, हेल्मेट यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.