• मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचा स्वरचित कविता सादरीकरण कार्यक्रम उत्साहात 

बेळगाव : येथील मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी आयोजित स्वरचित कविता सादरीकरणाचा कार्यक्रम सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ रोजी हिंदवाडी येथील मंदाकिनी पट्टण सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बेळगाव मधील सुमारे ४० कवी आणि कवियत्रींनी कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातून रसिकांना अतिशय दर्जेदार, आशय घन असलेल्या कवितांचा आस्वाद घेता आला. 

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती नीना जठार यांनी अत्यंत समर्पक शब्दात कविता या साहित्यिक प्रकाराचा आढावा घेतला.कवितेचा उगम, मानवी आयुष्यातील तिचे स्थान उत्कृष्ट उदाहरण देऊन सांगताना कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय सांगता आला पाहिजे अशा सुचनाही त्यांनी केल्या.अध्यक्ष अपर्णा देशपांडे यांनी अध्यक्षीय प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा भावे यांनी केले. आभारप्रदर्शन मोनाली परब यांनी केले. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन श्रीकांत प्रभू यांचे होते. हा कार्यक्रम राज्य मराठी विकास संस्थेच्या अनुदानातून संपन्न झाला. काव्यरसिकही मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.