- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीची वाट बिकट
- स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी शेवटची कसोटी जिंकावीच लागणार
ऑस्ट्रेलिया : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा १८४ धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २-१ ने आघाडी मिळवली आहे. अवसानघातक फलंदाजीमुळे या सामन्यात टीम इंडिया पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ हा कसोटी सामनाही ड्रॉ करेल अशी आशा होती, पण भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी फेरले.
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच आटोपला. भारताच्या ७ फलंदाजांनी तासाभरात एकापाठोपाठ आपल्या विकेट्स गमावल्या.
चौथ्या दिवशी ९ गडी गमावून ३३३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातली आणि भारताला ३४०धावांचे लक्ष्य दिले. मेलबर्नच्या मैदानावर हे विजयी लक्ष्य गाठणं टीम इंडियासाठी मोठे आव्हान होते, कारण आतापर्यंत या मैदानावर सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ३३२ धावांचा होता. पण भारताच्या युवा फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत कसोटी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला पण ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांनी शरणागती पत्करली.
भारताने पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत ३३ धावांवर ३ मोठे विकेट गमावले. यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसरे सत्र एकही विकेट न गमावता ३ बाद ११२ धावा केल्या. इथून भारतीय संघ हा सामना अनिर्णित ठेवेल अशी आशा होती. पण तिसऱ्या सत्रात भारताने पहिल्या तासाभरातच झटपट ७ विकेट्स गमावल्या. यामध्ये ऋषभ पंतने पुल शॉट खेळत आपली विकेट गमावली, त्याच्या या शॉटवरून त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. यानंतर यशस्वी जैस्वालही बाद नसतानाही त्याला बाद दिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. जैस्वाल ८२ धावा करून खेळत होता आणि शॉर्ट चेंडूवर फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला, पण तिसऱ्या पंचांनी स्निकोमीटरवर हालचाल नसतानाही त्याला बाद घोषित केले होते. यानंतर आकाशदीपच्या झेलबाद बाबतही अशीच चर्चा आहे.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमधील विजयासह या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता पुढचा आणि अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर सिडनी कसोटी भारताला कोणत्याही स्थितीत जिंकावी लागेल.
0 Comments