• जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

बेळगाव / प्रतिनिधी 

९ ते १९ डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून १३ कोटी दोन लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे‌.हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनात सर्वाधिक खर्च निवास, जेवण आणि वाहतुकीवर होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री, मंत्री, महनीय व्यक्ती, आमदार, वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासाठी २७५४ खोल्या आरक्षित केल्या आहेत. शहरातील सरकारी तसेच खाजगी गेस्ट हाऊस लॉज हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत. आठ ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिवेशनासाठी ७०० वाहनांची आवश्यकता होती, मात्र त्यामध्येही कपात करून ४०० वाहने भाडेतत्त्वावर तर इतर सरकारी वाहने अधिवेशन काळात वापरण्यात येणार आहेत.अधिवेशन काळात नेटवर्क व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी सेल फोन टॉवर ऑन व्हील त्याचबरोबर पाच लिज लाईन,३० रिपीटर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशन पाहण्यासाठी येणारे नागरिक विद्यार्थ्यांना योग्य त्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी विविध विभागा अंतर्गत १८ प्रकारचे पास वितरित करण्यात आले आहेत. बाहेरून आलेल्या मंडळींना ऑनलाइन पद्धतीने पासेस देण्यात येणार आहेत. वृद्धांना मुख्य प्रवेशद्वारापासून सुवर्णसौध पर्यंत येण्यासाठी विशेष बस सेवा ठेवण्यात आली आहे. सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशन काळात काँग्रेस शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याचबरोबर याच ठिकाणी सायन्स पार्क भरण्यात येणार आहे.म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर बेळगाव शहरातील ३२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांवर रोषणाई केली जाणार आहे असेही मोहम्मद रोशन यांनी सांगितले.