- अध्यक्षपदी अप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची निवड
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून नूतन अध्यक्षपदी रायबाग येथील अप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्षपदी सुभाष ढवळेश्वर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
तत्पूर्वी सकाळी उमेदवार एकाच वाहनातून बँकेचे संचालक अण्णासाहेब जोल्ले, महांतेश दोड्डगौडर एकाच गाडीतून बैठकीसाठी हॉटेलमध्ये आल्याने या निवडणुकीबद्दल कुतूहल वाढले होते. निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता होती. यादरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह गोकाकाचे आमदार रमेश जारकीहोळी, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, अण्णासाहेब जोल्ले आदींच्या उपस्थितीत वरिष्ठांना विश्वासात घेऊन करण्यात आलेल्या चर्चेअंती अप्पासाहेब कुलघोडे यांची बँकेच्या नूतन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वांचे मत विश्वासात घेऊन प्रक्रिया पूर्ण केली असून जिल्हा सहकारी बँकेची धुरा रायबागला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अरभावीचे आमदार आणि बीडीसीसी बँकेचे संचालक भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, ५० ज्येष्ठांचे मत घेऊन निवड प्रक्रिया केली. बँकेच्या निवडणुका पुढील सप्टेंबरमध्ये होणार आहेत. तोपर्यंत रमेश कत्ती यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठी बिनविरोध प्रक्रिया पार पडली आणि ग्राहकांचे हित जपले गेले, असे ते म्हणाले.
यावेळी महांतेश दोड्डगौडर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्यासह बँकेच्या मान्यवर संचालकांचा सहभाग होता.
0 Comments