• बेळगाव महापालिका आयुक्तांची हॉटेल व्यावसायिकांना सूचना 
  • हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये होणार असून, त्यात सहभागी होणाऱ्या मान्यवरांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी हॉटेल मालकांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात येणाऱ्या मान्यवरांसाठी हॉटेल्सची गरज असून, यासाठी हॉटेल मालकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सुमारे ६८ हॉटेल्सची आवश्यकता असून सुमारे २२०० खोल्या आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, डिसेंबरमध्ये लग्नसराई सुरू होताच हॉटेल व्यावसायिकांचा हंगाम सुरू होतो. अशावेळी अधिवेशनासाठी येणाऱ्यांना खोल्या देणे अवघड होणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी डिसेंबरपेक्षा थोडे आधीच अधिवेशन आयोजित करणे योग्य ठरेल, तसेच नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी अधिवेशन काळात येणाऱ्या पाहुण्यांना खोल्या उपलब्ध करून देण्यासह आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. 

या बैठकीत उपायुक्त उदयकुमार यांच्यासह अन्य अधिकारी व हॉटेल मालकांचा सहभाग होता.