• जळगे येथे शेतवडीतील भात पिकाचे नुकसान
  • हत्तीचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ सुरूचं असून मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी, सकाळी ७ वा. सुमारास या हत्तीने जळगा (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांच्या शेतवडीतील भात पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. काही ठिकाणी तर भात पिकाची कापणी करून वळी सुद्धा रचण्यात आली होती. परंतु या भात पिकाच्या वळ्या सुद्धा, या हत्तीने विस्कटून फस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेकवाड, सागरे, चापगाव, या ठिकाणी हत्तीने धुमाकुळ घातल्यानंतर, आज सकाळी, जळगा येथील नागरिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मुरलीधर गणपतराव पाटील आणि त्यांचे बंधू प्रमोद पाटील यांच्या शेतातील भात पिकाचे या हत्तीने अतोनात नुकसान केले. याचबरोबर भात पीकाची कापणी करून  एका ठिकाणी घातलेली वळी सुद्धा हत्तीने विस्कटून टाकली. काही ठिकाणी भात पिक सुद्धा फस्त केले आहे. याचबरोबर या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे या हत्तीने नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिणामी  या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी, या परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र वनखात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणीही या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.