- खानापूर तालुक्याच्या कारलगा गावातील घटना
- शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या कारलगा गावातील शेतवडीत, जंगली प्राण्याच्या हल्ल्यात रेड्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटना शनिवार दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास कारलगा गावच्या पूर्व भागातील शेतवाडीत घडली आहे. अशोक मारुती घाडी असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, कारलगा येथील शेतकरी अशोक मारुती घाडी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या शेतामध्ये भात कापणीसाठी गेले होते. भात कापणी करीत असताना त्यांनी आपल्या दोन म्हशी आणि दोन रेडके व एक रेडा यांना बाजूच्या माळरानात चरण्यासाठी सोडले होते. दुपारी जेवण झाल्यावर आपली जनावरे शेतवडीत आहेत का, हे पाहण्यासाठी शेतकरी अशोक मारुती घाडी माळरानात गेले असता, त्यांना आपला रेडा मृतावस्थेत पडलेला आढळून आला. यावेळी रेड्याची मान मोडलेली व मानेवर जखम झालेली दिसली. तसेच बाजूला रक्ताचा सडा पडला होता. हे पाहिल्यानंतर वाघ किंवा अन्य जंगली प्राण्याने रेड्यावर हल्ला केला असावा असा त्यांना संशय आला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेतातील लोक तिथे त्याठिकाणी जमले. लागलीच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली. या घटनेत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
0 Comments