• वीस हून अधिक जण जखमी : जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर  

सौंदत्ती : कारचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कारची झाडाला धडक बसली. या अपघातात एका वृद्धासह मुलाचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. मुनवळ्ळी (ता. सौंदत्ती; जि. बेळगाव) येथे ही घटना घडली. केंचप्पा लक्ष्मण इरण्णावर (वय ६०) व बसप्पा (वय १६) दोघेही (रा.चुंचनूर ; ता.रामदुर्ग) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर जखमींना अधिक उपचारासाठी सौंदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, रामदुर्ग तालुक्याच्या चुंचनूर गावातील २० हून अधिक लोक मजुरीसाठी धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील हेब्बळ्ळी  गावात गेले होते. काम आटोपून ते आपल्या गावी चुंचनूर येथे जात असताना हा अपघात झाला.या अपघातात केंचप्पा लक्ष्मण इरण्णावर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सौंदत्ती तालुका रुग्णालयात उपचारा दरम्यान बसाप्पाची प्राणज्योत मालवली.दरम्यान जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.  अपघातानंतर सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.