- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घडविले माणुसकीचे दर्शन
विजयपूर / वार्ताहर
महिला विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी बुधवारी विजयपूर येथे आलेल्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावला परतताना निदर्शनास आलेल्या एका गरजू कुटुंबाला मदत करून माणुसकी दाखवली.
कार्यक्रम आटोपून परतताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर विजयपूर - बागलकोट महामार्गालगत असलेल्या हनगनहळ्ळी येथे जेवणासाठी थांबल्या. जेवत असताना नजीकच्या छोट्याशा घरातून एक वृद्ध महिला भरलेल्या पाण्याच्या बाटल्या घरासमोर आणून ठेवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत मंत्री महोदयांनी चौकशी केली असता रस्त्यावरून जाणारे लोक पाणी पिण्यासाठी येतात, त्यांची तहान भागविण्यासाठी मी पाण्याच्या बाटल्या भरून घराबाहेर ठेवते असे तिने सांगितले.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गौरम्मा वडर नावाच्या आजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या मल्लू नावाच्या मुलाची चौकशी केली असता रस्ता बनवताना त्यांची गावातील घराची जमीन गेली. त्यामुळे राहायला घर नव्हते. नंतर या ठिकाणच्या बागायतदारांनी त्यांना एका खोलीच्या घरात राहण्याची परवानगी दिली. कोणत्याही गोष्टीशिवाय जीवनाला योग्य गती नाही, मग ती स्वयंपाकाची भांडी असो, अंथरूण असो किंवा अन्नधान्य मात्र त्या वृद्ध महिलेकडे पूर्वी असलेले रेशनकार्डही हरवले असून त्यांना शासनाकडून कोणतीही सुविधा मिळत नसल्याचे समोर आले.
मग मंत्री हेब्बाळकर यांनी परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ त्या गरजू महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. शिवाय गृहलक्ष्मी योजनेचे शिधापत्रिका व पैसे लवकरात लवकर येतील, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.
- गरजू महिलेला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक :
दरम्यान, याच मार्गावरून प्रवास करणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच.एस.गौडर यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन आजीच्या कुटुंबाची परिस्थिती सांगितली. तेव्हा आजीने मंत्र्याला सांगितले, या पोलीस अधिकाऱ्याने मला उपाशी असताना तांदूळ देऊन मदत केली होती. हे जाणून घेतल्यानंतर मंत्री हेब्बाळकर यांनी गरजूंना मदत केल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एच.एस.गौडर यांचे सरकारच्या वतीने आभार मानले.
यावेळी बोलतांना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, शासनाने या लोकांसाठी गृहलक्ष्मी आणि अन्नभागासह पाच हमी योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी गरिबांसाठी योजना आणल्या आहेत. ज्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल. एएसआय गौडर यांनी माणुसकी दाखवत आजीच्या कुटुंबाला मदत केली. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळेल याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments