- ऐनापूर येथील दुर्घटना : दोन मुले, आजी बचावले
कागवाड / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील पांडव कुटुंबीय ऐनापूर येथील नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी आले होते. तेथील कार्यक्रम शुक्रवारी आटोपून ते रात्री उशिरा कोल्हापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान ऐनापूर येथील कॅनॉलमध्ये कार कोसळल्याने या दुर्घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले. तर सुदैवाने वाहनातील दोन मुले व त्यांच्या आजीला वाचविण्यात यश आले आहे. आदर्श पांडव (वय ३१), शिवानी पांडव (वय २३) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत.त्यांची मुलगी अन्वी पांडव (वय ६ महिने), रजत पांडव (वय ४) व आजी रूपाली गाडेकर अशी दुर्घटनेत बचावलेल्यांची नावे आहेत.
घटनेविषयी अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे गावातील पांडव कुटुंब ऐनापूर येथील मारुती देवमाने यांच्या घरी लग्नकार्यासाठी आले होते. शुक्रवारी पूर्ण दिवस लग्न कार्यात ते व्यस्त होते. रात्री आठ वाजता सर्व कार्यक्रम आटोपून ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले. दरम्यान ऐनापूर - मंगसुळी मार्गावरील आबासाहेब पाटील यांच्या शेताशेजारी असलेल्या कॅनॉलनजीक येताच यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पाण्यात कोसळली. त्यात आदर्श व शिवानी यांचा पाण्यात गुदमरुन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्वी, रजत व रुपाली यांना वाहनातून सुखरूप बाहेर काढले.
सदर अपघाताविषयी आजी रूपाली गाडेकर यांनी पोलिसांना सविस्तर माहिती सांगितली. घटनेचा पुढील तपास बेळगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती श्रुती, अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हळ्ळूर, पीएसआय गंगा बिरादार करत आहेत.
0 Comments