चंदगड (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंदगड तालुक्यात तब्बल ७ लाख ४० हजारांची गोवा मद्यसाठा जप्त करण्यात आला  आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पार्ले, (ता. चंदगड) गावच्या हद्दीत रविवारी ही कारवाई केली. या प्रकरणी शिवाजी धाकलू गावडे (वय ३८ रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.  

कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. यावेळी अवैध दारुवर कारवाईबाबत माहिती घेताना पार्ले, (ता. चंदगड) गावच्या हद्दीत जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याच्या शेडनजीक उघड्यावर गोवा बनावटीच्या दारुचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने छापा टाकून ७ लाख ४० हजार ८८० रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा ताब्यात घेतला आहे. अधिक चौकशी केली असता त्याने सदरची दारु महाराष्ट्राचा कर चुकविणेसाठी गोवा राज्यातून विक्री करण्यासाठी आणली असल्याची कबूली दिली. 

त्यावरून आरोपीवर चंदगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, प्रकाश पाटील, दिपक घोरपडे, सागर चौगले व सुशील पाटील यांचे पथकाने केली.