बेळगाव / प्रतिनिधी 

बैलहोंगलच्या वण्णूर येथील युवकाच्या खुनाचा उलगडा झाला असून त्याच्या पत्नीनेच दीड लाखाची सुपारी देऊन पतीचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. 

बेळगावात शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनीं सदर माहिती दिली. यल्लाप्पा ढुंडाप्पा कोनीन (वय 53), निलम्मा निंगाप्पा अरवळ्ळी ऊर्फ अरमुकळी (वय 38), महेश बसवराज गुळण्णावर (वय 27) तिघेही राहणार वण्णूर अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. नेसरगीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, कित्तूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, नेसरगीचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. गौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या निंगाप्पा बसाप्पा अरवळ्ळी ऊर्फ अरमुकळी (वय 41) याचा तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. निंगाप्पाचा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नव्हता. त्याचा भाऊ कुबेंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेसरगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद व बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.

खून झालेल्या निंगाप्पाची पत्नी निलम्मा हिचे अनैतिक संबंध असल्याचे पती निंगाप्पाला कळाले होते. आपले अनैतिक संबंध उघड झाल्यामुळे प्रियकराशी मिळून तिने पतीचा काटा काढण्याचे ठरविले. यल्लाप्पा कोनीन (वय 53) याला दीड लाखांची सुपारी देऊन निंगाप्पाचा खून करण्यात आला आहे. पत्नी निलम्मा व तिचा प्रियकर महेश यांनी दिलेल्या सुपारीवरून यल्लाप्पाने कट्ट्यावर झोपलेल्या निंगाप्पावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी पत्नीसह तिघा जणांना अटक केली आहे.