बेळगाव / प्रतिनिधी 

वक्फ मंडळ रद्द करण्याच्या मागणीसाठी बेळगाव मध्ये भाजपने "आपली जमीन - आपला हक्क" आंदोलना अंतर्गत भव्य रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

यावेळी काँग्रेस सरकारच्या धोरणांवर रोष व्यक्त करताना वक्फ मंडळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत बेळगाव शहरातील सरदार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपने भव्य रॅली काढली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "आपली जमीन - आपला हक्क" या घोषवाक्यासह आंदोलन करण्यात आले.

भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्य सरकार भ्रष्टाचारात बुडाले आहे आणि अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार आहे. वक्फ मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा करण्याचे षडयंत्र सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात आणि अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात. तसेच, मंत्री जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले की, "वक्फ हटाव, अन्नदाता बचाव” आंदोलन भाजपने उचलले आहे. काँग्रेस सरकारने नेहमीच अल्पसंख्याकांची तुष्टीकरण धोरणे राबवली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानुसार मंत्री जमीर अहमद हिंदू आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहेत. वक्फ मंडळ रद्द करणे ही काळाची गरज आहे. तसेच, सरकारच्या गॅरंटी योजनांमधील अडथळ्यांसाठी रेशन कार्ड रद्द करण्याच्या प्रक्रियेविरोधात रोष व्यक्त केला. 

भाजपच्या महिला प्रमुख उज्वला बडवाण्णाचे आणि सोनाली सरनोबत यांनी देखील कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, वक्फ मंडळ शेतकऱ्यांसाठी घातक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी वक्फ मंडळ रद्द करावे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री राजीनामा द्यावा.

भाजपचे माजी आमदार आणि राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी काँग्रेस सरकारवर कठोर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काँग्रेस सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवत आहे. हिंदू मंदिरांच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनींच्या रक्षणासाठी भाजपने हे आंदोलन उचलून धरले आहे. वक्फ कायदा रद्द करणे हे गरजेचे आहे. या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.