वेंगुर्ले / प्रतिनिधी
शिरोडा वेळागर (ता. वेंगुर्ले ; जि. सिंधुदुर्ग) येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. विनायक रमेश शिंदे (वय ४४ रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) असे मृत पर्यटकाचे नाव असून तो श्रीराम सेना हिंदुस्थानचा कार्यकर्ता होता.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते. हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीचवर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून हे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र यातील विनायक शिंदे हा पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे गेला. किनाऱ्यापासून काही अंतरावरच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिरोडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
0 Comments