बेळगाव / प्रतिनिधी  

संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरील दरोडा प्रकरणी आणखी एक कलाटणी मिळाली असून याआधी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी वेगळेच असल्याचे समोर आले आहे.  

यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती देताना सांगितले,  महामार्गावरील दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे वेगळेच असून मूळ प्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील 1.17 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून महामार्गावरील दरोड्याप्रकरणी वाहनात असलेले आरिफ, सूरज आणि अजय यांच्याकडे चौकशी केली असता कारमध्ये पैसे सापडले.

पुढील तपासणी केली असता, वाहन आणि दरोड्याचा कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. हे वाहन नेर्ली, कामतनूरजवळ सापडले. तिथेच दुसरी एर्टिगा गाडी जाणार होती. महाराष्ट्रात गेलेल्या खऱ्या वाहनाचा तपास आणि शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. याप्रकरणातील एर्टिगा कारचा क्रमांकही बनावट आहे. कारचालक भरत हा जुना ड्रायव्हर नवनीत आणि सूरजच्या संपर्कात आहे.

मिळालेले पैसे घेऊन तो पळून गेल्याचे समजले आहे. सांगलीतील एका गोडाऊनमध्ये सोळा लाख रुपये ठेवण्यात आले आहेत सूरज आणि नवनीत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून 1.17 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.