• रखडलेली उड्डाणे लवकरच पुन्हा सुरू करा
  • विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांना केली सूचना 
 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव येथील सांबरा विमानतळाला खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी भेट देऊन विमानतळाच्या विकासाबाबत व नव्याने बांधण्यात येणाऱ्या टर्मिनलच्या विकास कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी टर्मिनल बिल्डिंग, रनवे, टॅक्सी वे, बॅगेज हाताळणी यंत्रणा, सुरक्षा स्कॅनर यासह विविध कामांची पाहणी करून सुरक्षा उपकरणांसह प्रलंबित कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी विमानतळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा वाढविण्याच्या कामावर प्रदीर्घ चर्चा करून रखडलेली उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. बेळगावपासून राज्यातील विविध जिल्हे जोडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, जे बेळगावच्या व्यापारी व उद्योगांच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल, असे सांगून, निलजी सांबरा या रस्त्याचे काम सुरळीत चालण्यासाठी लवकरात लवकर सुरू करावे, अशी सूचना केली.

दरम्यान, विमानतळ संचालक एस त्यागराजन यांनी खासदार प्रियंका यांना माहिती दिली की शेजारील महाराष्ट्र आणि गोव्याला लागून असलेले बेळगाव हे तीन राज्यांचे केंद्र आहे. 357 कोटी रु. खर्चातून, किफायतशीर नवीन टर्मिनल बांधून कनेक्टिव्हिटी प्रणाली सुधारली जाईल. बेळगाव हे प्रगतीचे आश्रयस्थान ठरेल. विमानतळ अपग्रेडेशनसह सर्व भौतिक कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच सर्व कामे पूर्ण करून विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.